Sunday, 27 May 2012

म्हातारा गाव

गावाकडे खूप वर्षांनी गेलो, पाहिले

गाव म्हातारा झाला होता.

मित्र गेले भरलेल्या शहरात,

गाव रिकामा झाला होता.

 

जिथे होता पार वडाचा ,झाला तिथे बार,

तिन्ही सांजेला, उघडते ज्याचे  दार.

नेट काफे ने भरल्या गल्ल्या नि,

खेळ झाले होते हद्दपार.

 

नवीन काही झाली होती हॉटेल्स,

अन, गर्दीने वाहत होते मॉल.

मोबाईल कानाला लावून ,

लोक घेत होते कॉल .

 

धुळीचे रस्ते नि  नागमोडी वाटा,

तुडवल्या ज्या कधी,  त्या पुसून गेल्या.

रस्ते झाले होते, जरी गुळगुळीत,

आठवणी मात्र, माझ्या रुसून गेल्या.

 

जिथे कधी सगळ्या नजरा होत्या अपुल्या,

अनोळखी नजरा मला चावत होत्या,

कोण तू, कोठून आलास, माझ्याच गावात,

मला विचारात होत्या.

 

पोचलो मी माझ्या घरी,

रस्ता संपवीत, करीत विचार,

दारात म्हातारी आई अन,

होता बाबांच्या फोटोला हार.

 

गावाकडे खूप वर्षांनी गेलो,

बघितले गाव म्हातारा झाला होता.

आपले ते सोडून गेले ,

गाव रिकामा झाला होता.


 

21 ऑक्टोबर 2010



Followers