कुठे तरी फिरायला जायचे खूप दिवसांपासून मनात होते. कधी सुट्ट्या नाहीत म्हणून तर कधी आणखीन काही तरी कारण, पण योग काही येत नव्हता. तो आला शेवटी ह्या फेब्रुवारी मधे. आम्ही कॉर्बेट नेशनल पार्क ला जायचे ठरविले
सगळी तयारी झाली, तिकिटे झाली आणि आम्ही एकदाचे पोहोचलो कॉर्बेटला.
तिथे ढीकुली नावाच्या गावात हॉटेल मध्ये बुकिंग होते. रात्री आम्ही तिथे पोहोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळी सफारी ठरवली होती
सकाळी उत्साहात ६ वाजताच नोघलो. जीप आलीच होती. ड्राईवर ला पहिला प्रश्न विचारला कि "काल कोणाला वाघ दिसला होता का? आपण ज्या दरवाज्यातून जाणार आहोत त्या भागात वाघ कधी दिसला होता?"
ड्राईवर हसूनच म्हणाला "सगळे पर्यटक हाच प्रश्न विचारतात. पण ते हे विसरून जातात कि ते खऱ्या जंगलात जात आहेत. प्राणीसंग्रहालयात नाही. " पुढे म्हणाला "आपण मोकळ्या जंगलात जात आहोत. वाघ दिसेल कि नाही काही सांगू शकत नाही. ते नशीब आहे. पण मोकळेपणी फिरणारे जे प्राणी दिसतील त्यांना बघण्याचा आनंद घ्या. वाघ दिसायचा तर आत्ता इथे रस्त्यावर पण दिसू शकतो. आणि नाही तर सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला सफारी करून पण दिसत नाही. काल संध्याकाळच्या सफारीमध्ये ४ जिप्सी एका पाठोपाठ जात होत्या त्यात फक्त एका जिप्सीला वाघ दिसला पुढे गेलेल्या तीन जिप्सींना वाघाचा आवाज पण ऐकू आला नाही. पण जंगल खूप सुंदर आहे. असा अनुभव तुम्ही कधी घेतला नसेल. "
आमची जीप निघाली. थोड्या वेळानी जंगलात जाण्याच्या गेट जवळ पोहोचलो. तिथे योग्य ती कागदपत्रे दाखवून आणि परवाना घेऊन थांबलो. आमचा गाईड तिथून आमच्या बरोबर येणार होता. तो आला आणि जंगलाची माहिती सांगू लागला. त्याने पण हेच सांगितले कि जंगल मोठे आहे आणि वाघ मुक्त संचार करत असतो त्या मुळे तो दिसेलच असे सांगू शकत नाही. आपण प्रयत्न करू कि तो दिसेल.
पुढे निघलो. गर्द जंगल. मोठे मोठे वृक्ष. आजून जेमतेम उजाडत होते त्या मुळे काही वेगळेच भारावलेले वातावरण. पक्ष्यांचे आवाज. आणि जीपची घुरघुर.
५ मिनिटे पण झाली नसतील आणि रस्त्याच्या बाजूला हरणे दिसली. आम्ही जीप थांबवली. त्याने इंजीन पण बंद केले. हरिणे शांतपणे चरत होती. कोणी काही बोलत नव्हते. पटापट फोटो काढून झाले. शेवटी गाईड म्हणाला कि आता चालूया, हरिणे पुढेपण खूप दिसतील. आम्ही पुढे निघालो .
अचानक परत जीप थांबली. गाईड ने जीपच्या बाजूला बघायला सांगितले. पहिले तर रस्त्याच्या धुळीत वाघाचे ठसे पडले होते. रात्री किंवा पहाटे वाघ तिथून गेला होता आणि त्या नंतर आमची जीपच तिथे आली असेल कारण ठसे एकदम स्पष्ट होते. आम्ही गप्प राहून इकडे तिकडे बघू लागलो.
कुठलाही आवाज नाही. जीप चे इंजिन बंद. पक्ष्यांचे आवाज मधून मधून येत होते. वाघ जरी दिसला नाही तरी ती शांतता, ते हिरवेगार जंगल, ती थंडी, झाडांच्या पानातून येणारा सूर्यप्रकाश, सगळेच अद्भूत वाटत होते.
परत गाइडनेच त्या अद्भूत जगातून बाहेर आणले आणि आम्ही पुढे निघालो.
१ तासाच्या त्या सफारीत नंतर आम्ही अनेक हरणे, सांभर, मोर, बार्किंग डीअर, १ कोल्हा वगेरे पाहिले.
पहिली सफारी संपली. आम्ही जंगलाचा आनंद घेऊन पण वाघ न बघता परत आलो.
दुसऱ्या दिवशी दुपारची सफारी ठरवली होती. आम्ही तयार झालो आणि निघालो. त्या ड्राईवरने न विचारताच सांगायला सुरुवात केली कि वाघ दिसणे हे नशिबावर असते आज सकाळच्या सफारीत वाघ कोणालाच दिसला नाही.
आम्ही गेट वर पोहोचलो. तिथले सगळे सोपस्कार करून, गाईड घेऊन पुढे निघालो. हरिणांच्या कळपाने आमचे जणू स्वागतच केले.
मग सांभर, मोर, लंगूर वगेरे बघत आम्ही पुढे निघालो. पुढे एक सुकलेले नदी पात्र लागले. रस्ता त्यातून पुढे जात होता. आम्ही नदी ओलांडून पुढे गेलो आणि एक मोठी हत्तीण दिसली. तिच्या बरोबर तिचे पिल्लू होते. अचानक त्या हत्तीणीने मोठा, बिगुल सारखा आवाज काढला आणि आम्ही थांबलो. इकडे तिकडे बघत होती तोच समोरून २ जिप्सी येताना दिसल्या. त्यातल्या एका जिप्सीचा ड्राईवर आम्हाला मागे जायला सांगत होता.
थोडे जवळ आल्या नंतर तो म्हणाला कि त्यांना वाघ दिसला आहे, तो नदीच्या वरच्या बाजूनी पत्रातून खालच्या बाजूला येत आहे. आम्ही सगळे मागे फिरलो आणि नदी पत्रात जाऊन थांबलो.
१०-१५ मिनिटे तिथे थांबलो पण वाघ काही दिसला नाही.
आम्ही सगळे परत फिरलो.
आता काही सफारी ठरलेली नव्हती त्या मुळे आता वाघ दिसण्याची शक्यता नव्हती. आम्ही काहीसे खट्टू झालो होतो पण जंगल इतके सुंदर होते आणि इतके शांत होते कि तो आनंद पण खूप होता. शिवाय ऑफ सिझन ला गेलो होतो त्यामुळे कुठे गरदी, गोंगाट, घाण नाही. आपण भारतात आहोत कि बाहेर असे वाटावे इतके सगळे शांत आणि स्वच्छ होते.
तिसऱ्या दिवशी आम्ही सकाळी पक्षी बघायला निघालो. एक २०-२२ वर्षाचा मुलगा आमचा गाईड होता. चालत निघालो होतो तेव्हा तो सतत माहिती सांगत होता. आम्ही चलात तिथल्या सस्पेन्शन ब्रिज जवळ पोहोचलो. खाली कोसी नदी वहात होती. अंगाला गार वारा झोंबत होता. नदीच्या समोरच्या काठाला जंगल होते. सीताबनी चे जंगल. ब्रिज पार केला कि रस्ता पुढे जातो. त्याच्या एका बाजूला जंगल आणि दुसऱ्या बाजूला खाली नदी. नदी कधी दिसते कधी झाडीमुळे फक्त आवाज येतो. आम्ही पुढे निघालो. साधारण एक किलोमीटर असा रस्ता असेल आणि मग समोर गिरिजादेवीचे नदीपत्रातल्या खडकावर उभे असलेले मंदिर दिसते. आम्ही त्या मंदिरात आधीच जाऊन आलो होतो म्हणून परत काही गेलो नाही.
पुढे थोडे अंतर गेल्यावर रस्ता दाट जंगलात जात होता. गाईड म्हणाला कि आता पुढे जाने धोक्याचे आहे आपण मागे फिरु. आम्ही परत वळलो.
आम्हाला इथपर्यंत येताना बरेच पक्षी दिसले. सगळे साधारण भारतीय पक्षी होते आणि जवळ जवळ सगळे इथे पुण्याला पण दिसतात. आम्हाला सातभाई, मोर, पोपट, टिटवी, बुलबुल चे ४ प्रकार, Wall creaper, दयाळ आणि दुसरे पक्षी दिसले.
परत आम्ही त्या रात्याला लागलो. एका बाजूला सीताबनी चे जंगल आणि दुसऱ्या बाजूनी नदीचा आवाज येत होता. आम्ही काही बघत , बोलत चाललो होतो. हा रस्ता गावकऱ्यांचा नेहेमीचा रस्ता होता. अचानक एक माणूस समोरून आला. खरे तर जंगल बघण्याच्या नादात तो कोणत्या बाजूनी आला हे नीट कळलेच नव्हते. तो आमच्या बरोबर गावाच्या दिशेला चालू लागला. त्याच्याकडे एक कुऱ्हाड होती आणि डोक्यावर लाकडांची मोळी.
तो गाईडशी बोलू लागला कि त्याने वाघाचा आवाज ऐकला आणि घाबरून तो अर्ध्या रस्त्यातून परत फिरला. आम्ही ४ जण आहोत म्हणून आता आमच्या सोबतीने तो परत गावाकडे चालला आहे. "बाघ कि आवाज सुनी और मै घाबरा गया. अकेला आदमी हून, कोई हथियार नाही ही, सो वापस चला आया था. अब सब साथमे है तो वापस चलता हुं. "
मला वाटले कि आम्ही टुरिस्ट आहोत हे बघून हा माणूस बाता मारतो आहे. आम्ही पुन्हा रमत गमत चालू लागलो. थोडे पुढे गेल्यावर तो माणूस म्हणाला "यही पर आवाज आइ थी. जलदी निकल चलो. जानवर शायद आसपास हि हो. " तो भराभर पुढे जाऊ लागला. आम्ही तिथे थांबलो आणि खरोखर ह्या नेहेमीच्या रस्त्यावर वाघाचा आवाज येतो का ते ऐकायला थांबलो.
आणि अचानक खरोखर वाघाची डरकाळी आम्हाला ऐकू आली. चांगले ६ -७ सेकंद तो आवाज कुठून तरी जंगलाच्या दिशेने वरती जी झाडे होती तिथून आवाज येत होता. आम्ही सगळे गप्प.
वाघाचा आवाज खरोखर ऐकायला येतो आहे ह्यावर विश्वास बसत नव्हता. पण तरी छातीत धडधड होत होती. गाईड घाई करू लागला. आम्ही पुढे निघणार तो परत वाघाची डरकाळी ऐकू आली. आता मात्र खरोखर भीती वाटली. जर वाघ खरोखर समोर आला तर काय होईल हा विचार मनात आला. हातात ३ छत्र्या होत्या. वाघ दिसला तर त्या छत्रीला तो घाबरून पळेल का कि घाबरल्या मुळे आम्ही पळूच शकणार नाही असा विचार आला.
आम्ही इकडे तिकडे बघत होतो. आता आवाज पण बंद झाला होता. आम्ही भरभर पुढे निघालो. तो मोळीवाला माणूस केव्हाच निघून गेला होत.
थोडे पुढे गेल्यावर सस्पेन्शन ब्रिज दिसला आणि मोकळ्या जागेत आलो.
तिथे परत नदी दिसली.
मागे वळून पहिले आणि त्या न दिसलेल्या पण ऐकलेल्या वाघाला सांगितले कि "वाघारे, आता नाही दिसलास हे बरेच केले. पण आम्ही परत येऊ तुला बघायला. तेव्हा आम्हाला दर्शन दे. अश्या रस्त्यात नाही पण सफारीला जाऊ तेव्हा दर्शन दे. आता मात्र तुझा आवाज मनात साठवून आम्ही जातो आहोत."
कोर्बेटहून आम्ही परत फिरलो ते न बघितलेल्या वाघाच्या आठवणी आणि त्याला परत जाऊन बघण्याची इच्छा घेऊनच