ऑफिसमध्ये एक जण ६ महिन्याकरिता जर्मनीहून आला होता. गेले काही महिने तो आमच्या बरोबर जेवत होता. इथल्या गणपती, दिवाळीचा त्याने अनुभव घेतला होत. एक दिवस जेवता जेवता आमच्या गप्पा चालल्या होत्या.
त्याने तिथे मिळणारा मसाला डोसा घेतला होत. एकाने शाकाहारी जेवण, तर एकाने चिकन. एकाचा उपवास म्हणून त्याचा फलाहार. एक घरून डबा आणत असे.
त्याला विचारले कि कसे वाटते आहे इथे भारतात? आणि हा मसाला डोसा तिखट नाही लागत? तर हसून म्हणाला, "मला आवडले इथे. हे जेवण पण आवडले मला. हे थोडे तिखट आहे, पण छान आहे. मला मुंबई, पुणे, आगरा सगळे खूप आवडले. पण इथे सगळे खूप confusing आहे. खूप विरोधाभास आहेत इथे.
आता हेच पाहा ना. हा चिकन खातो आहे, आणि हा दुसरा आज उपवास आहे म्हणून नुसती फ़ळे. आणि तो एक कधीच उपवास करत नाही तरी शुध्ध शाकाहारी आहे. असे कसे?
म्हटले हे तर काहीच नाही, इथे तुला प्रत्येक गोष्टीत विरोधाभास आणि ते सुध्धा आगदी पराकोटीचे, बघायला मिळतिल.
एकाच घरात एक शुध्ध शाकाहारी आणि एकाला मांसाहारा शिवाय घास गळ्याखाली जाणार नाहि.
एकाच घरात मुलाचे काय लाड! आणि त्याच घरात मुलगी नकुशी!
एकाच घरात ४ पिढ्या एकत्र नांदतात आणि एखाद्या घरात ४ माणसे पण नाहीत! विभक्त कुटुंब, त्यात मुले नवरा-बायको आणि एक मुल.
एकाच घरात एक देव-धर्म, पूजा-अर्चा करणारा आस्तिक आणि त्याच घरात एक जण देव न मानणारा. नास्तिक.
एखाद्या घरात एक व्यायामाचा भोक्ता आणि एक आळश्यांचा राजा.
एकाच घरात एक खाऊन खाऊन रोगांना निमंत्रण देणारा आणि एक कुपोषित.
एकाच घरात एक गायनाचा रसिक आणि एक मात्र औरंगझेब!
एकाच घरात एक मुलगी परंपरा जपणारी, भारतीय पोशाकात राहणारी तर तिचीच बहिण पाश्चात्य कपड्यात वावरणारी. एकीला साडी शिवाय काही आवडत नाही आणि एकीला साडी आवडत नाहि.
एखाद्या घरात सासू सुनेला छळणारी, तिला जाळून मारणारी तर एखाद्या घरात सून सासूच्या डोक्यावर भारी.
एखादी डोक्या पासून पायापर्यंत सोन्याने मढलेली तर एखादी लंकेची पार्वती.
एखाद्याच्या एक वेळच्या जेवणाला हजारो रुपये, तर एखाद्याला एक वेळ चे जेवण महाग.
कुठे कपड्यांचे ढीग कापटात साचलेले, तर कुठे अंग झाकायला ५ वार नाही.
कुणाच्या घरी पाण्याचा नळ भसाभसा वाहातोय तर कोणाची पाण्यासाठी दाही दिशेला वणवण.
कोणी लाखो करोडो खाऊनही अतृप्त तर कोणी दुसर्याचे हरवलेले लाखो परत करून तृप्त.
कोणी टेकड्या फोडून, डोंगर ओरबाडून गब्बर होणारे तर कोणी पर्यावरण संवर्धन करून आयुष्य वेचणारे.
कोणी मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारे आणि कोणी लोकांसाठी जिवाचे रान करणारे.
कोणी जात-पात मानणारे आणि कोणी आंतरजातीय विवाहाचे समर्थक.
काही धर्म वेडे तर काहींना सर्व धर्म समान.
कोणी बाबा- महाराज-बुवा-भगतांच्या मागे लागून स्वताच्या किंवा दुसर्याच्या लेकरांची आयुष्ये संपवणारे तर कोणी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात आयुष्य घालवणारे.
कोणी कचरा टाकण्यासाठी कचराकुंडी पर्यंत वाट वाकडी करणारा आणि एकासाठी सर्व सार्वजनिक ठिकणेच कचराकुंडी!
कोणी देशाला विकून खाणारा आणि कोणी देशासाठी सीमेवर सदा तैनात.
कोणी प्राणिमित्र तर कोणी प्राण्यांच्या व्यापार्यांचे मित्र.
एक लाल दिवा लागला म्हणून रस्त्यात थांबणारा, आणि एक वाहतुकीची साधी शिस्त न पाळता, लाल दिवा लागला म्हणून थांबलेल्याला मागून धडकून त्याचा जीव घेणारा.
एक पैश्यांसाठी मत विकणारा आणि एक मत न देता व्यवस्थेवर शिव्या घालणारा.
कोणी समाजातल्या वाइटाविरुध्ध ठाम उभे ठाकणारे आणि आम्ही नुसतेच गप्पामारून कोणतिही ठोस कृती न करणारे !
खरेच किती विरोधाभास आहे!
सर्व जण विचार करत उठलो. जेवण झाले होते. कामाला लागायची वेळ झाली होती.
No comments:
Post a Comment