Tuesday, 15 October 2019

क्षण

देविकाऽऽ ए देविकाऽऽ. तू खेळायला येते आहेस काऽऽऽ? घरा खालून आवाज यायचा आणी हिची चिडचिड सुरू व्हायची.

"सकाळ झाली नाही आणी ह्यांचा दंगा सुरू. शाळेत का नाही पाठवत ह्यांना? नाही तर तोंडाला टेप तरी लावा! सकाळी सकाळी पाठवून दिले खेळायला! आता ह्या सगळ्या इथे दुपार पर्यन्त दंगा करत बसतील. वैताग आहे नुसता."

हे सगळे तीच्या मनात सुरू असे तरी नवर्या च्या आणी सासू- सासर्यान्च्या ते लक्षात आलेले असे.

तिची आंघोळीची वेळ आणी त्या देविकच्या च्या आंघोळीची वेळ साधारण सारखीच. वर खाली रहात असल्या मुळे एकाच्या बाथरूम मधे बोललेले दुसर्याला ऐकू जाई.

"ही भवानी आंघोळ करताना पण किती बडबड करते? गाणि काय, हसणे काय, रडणे काय. कधी तरी आदळ आपट! बाथरूम मधे पण शांतता नाहीच!"

ही चिडचिड करत बाहेर निघणार आणी घरच्यांना कळलेले असे की आज देविका आंघोळीची मजा घेत आहे.

ती ऑफीसला निघाली की युनिफॉर्म घालुन, बडबड करत देविका खाली हजर.
" बाय ऽऽऽ मावशी. आज तर माझा बर्थ डे आहेऽऽऽ. मी चॉकलेट देणार आहे सगळ्यांना ऽऽऽ"
" हैप्पी बर्थ डे" कसंनुंस म्हणून ती पुढे पळणार.
"अरे देवा! म्हणजे आज लवकर घरी यायलाच नको. संध्याकाळी ही आणी हिच्या असंख्य बडबडया मैत्रिणी हिच्या घरी येउन दंगा करणार. इतर दिवशी धिंगाणा सुरुच असतो. आज तर काय, काहि बोलायलाच नको!"

तर, रोज कोणत्या तरी करणानी देविकाचा आवाज हीच्या घरात यायचा आणी ही चिडचिड करायची. नवर्यानी, सासू-सासर्यानी समजावुन, रागावून, दुर्लक्ष करुन पाहीले. पण काहीही परिणाम नाही.

एक दिवस नको तेच घडले. चिडचिडत ऑफीसला जायला घरातुन बाहेर पडली आणी सोसायटीच्या बाहेर स्कूटर घसरून पडली. एका पायाला फ्रेक्चर आणी एका पायाला बरीच जखम.

3 दिवस हॉस्पिटलच्या शांततेत घालवुन घरी परत आली. रात्री औषधांमुळे गाढ झोप लागली होती. सकाळी काहि वेगळ्याच स्पर्शामुळे जाग आली. कोणीतरी हळुवार पणे गालावरून, हातावरून मऊ मऊ पीस फिरवत होते. 

डोळे उघडुन बघितले तर तीची देविका तीच्या गाला वरून, हातावरून तिचा लहानसा हात फिरवत होती. हिचे डोळे उघडले आहेत हे बघून देविकाने तीच्या हातात एक चॉकलेट आणी एक टपोरे गुलाबचे फुल ठेवले. तीनेही हसुन तीच्या देविकाला जवळ घेतले.

" ए मावशीऽऽ तू पडलीस का गं? तुला खुप लागलं आहे का? आईनी सांगितले मला की तुला खुप लगले आहे. एऽऽऽ मी तुला आला मंतर कोला मंतर करु का गं? मला लागले की आई तसेच करते आणी मग मला लगेच बरे होते! "

" मावशी????" हिने देविकाला दूर ढकलले.

"म्हणजे ही माझी देविका नही तर? मग ही कोण आहे? अरेऽऽ ही तर खालच्या मजल्या वरची ती उनाड, जोरात ओरडणारी, दंगा करणारी, सतत बडबड करणारी मुलगी आहे! "

"पण, नाही! ही आज तशी का वाटत नाहिये? ही निरागस, गोंडस, बोलकया डोळ्यांची, सुंदर परी माझ्या देविका सारखी का वाटते आहे?"

" नाही. माझी देविका तर वर्षभरापुर्वी, ह्या घरात यायच्या आधीच, हिच्या एवढी असतानाच, मला सोडून निघुन गेली आहे. कायमची. अचानक. कधी न येण्या साठी!"

"नाही नाही! तरी असे का वाटते आहे की ही बाहुली, पण माझीच देविका आहे! जी गेली ती तर परत येणार नाहिये. पण जी आहे तिचा तिरस्कार का?"

पुढे काही विचार करायच्या, कळायच्या आत तिने देविकाला जवळ घेतले. डोळ्यात एक वर्षानी पहिल्यांदा पाणी आले होते. मनातली चिडचिड, दु:ख, राग, असहायता कुठे तरी दूर जात आहे असे वाटू लगले. मन जणुकाही आज मोकळे झाले होते.

दारात पाणावलेल्या डोळ्यांनी नवरा, सासु, सासरे एकमेकांकडे अर्थपुर्ण नजरेने बघत होते. मनसोपचार तद्न्यानी सांगितलेले तिघांना आठवत होते.
" औषधांचा परिणाम हळूहळू होईलच पण तो एक क्षण यावा लागेल जेव्हा ही सत्य परिस्थितीचा स्वीकार करेल. त्या क्षणा पासून ही नॉर्मल होइल. तो पर्यन्त औषधे सुरू ठेवा. संयम ठेवा. ' त्या' क्षणाची वाट बघा."

तिघांना कळले होते की तो क्षण आज आला आहे. देविका गेलीच पण त्यांची असलेली मालविका मात्र आज त्यांना परत मिळाली आहे!

No comments:

Post a Comment

Followers