Sunday, 13 October 2019

खरेदी

दिवाळी आलीये जवळ.
खरेदी करायला हवी.
काय काय घ्यायचे आहे. कोणा कोणा साठी घ्यायचे आहे.
यादीच करायला हवी.
वाण सामान काय आणी किती लागेल. ती एक वेगळीच यादी.
कामाला येणार्या बायकांना काय द्यायचे त्याचा विचार.
दिवाळी आली की ही अशी जास्तीची कामे उभी रहातात.
आज बाजारात जाऊन काहि छोटी मोठी खरेदी केली.
सवयी प्रमाणे घरच्या ग्रुपमध्ये लगेच फोटो टाकले. आणी प्रतिक्रियांचा प्रवाह सुरू झाला.
अगं कुठून आणलेस हे?
छानच आहे.
कीतिला पडले गं?
बरं मिळालं इतक्यात.
मला पण जायचे आहे खरेदीला. पण वेळच मिळत नाहिये.
एक न दोन.

बायकांची अशी बडबड सुरू होती त्यात भावानी मधेच एक पिल्लू सोडले.
कशाला जाता त्या गर्दीत. मी तर सगळी खरेदी amazon नाही तर Flipkart वरून करतो. घरातून अजिबात कुठे हलायला नको. सुखानी बसुन काय हवे ते घर बसल्या मागवता येते.

आणी मी विचार करु लगले की खरंच उगाच बाहेर फिरुन वेळ वाया न घालवता online खरेदी केली असती तर?

पण नाही हं.

आपण बाजारात जातो तेव्हा काय नुसत्या वस्तू घ्यायला जातो का?
बाजारात जातो तेव्हा किती मज्जा असते.

कपडे घ्यायला गेलो की त्यांचे रंग, पोत, डिज़ाइन किती गोष्टी आपण दाखवायला सांगतो. त्या वेळी ते कापड हातात घेउन त्याचा स्पर्श अनुभवतो. मऊ आहे का. रेशिम असेल तर स्पर्श कसा आहे. खादी सिल्क असेल तर वेगळा स्पर्श.

पु.ल. म्हणतात तसे कधी तरी ह्या काळ्या साडीत आजुन काळा रंग आहे का अशी विचारणा.
दुसर्याकोणा साठी साडी/कापड घ्यायचे असल्यास त्या व्यक्ती ला तो रंग शोभेल का; आवडेल का. किती गोष्टी.

शेवटी मना सारखे रंग वगेरे नाहीच दिसले तर एक शेवटची विनंती..धमकी वजा विनंती..भैया दुसरे रंग दाखव नही तर राहू दे आता.

दुकानदार पण पक्के असतात. आधी चांगला माल बाहेर काढत नाहित. गिर्हाईक जातंय बघून मग "थांबा हं, दाखवतो" म्हणून मग चांगले काहि बाहेर काढणार.
आता ऑनलाइन शॉप मधे हे असे कधी होते का?

हे डिज़ाइन. हे रंग. ही किंमत. पाहिजे तर कार्ट मधे टाका नही तर राहू द्या.

एक वस्तु घ्यायची असेल तरी बाहेर पडलो की हे बघ ते बघ. कुठे चप्पला, कुठे प्लास्टीक ची भांडी, इथे नॉन स्टीक तिथे स्टील, पलिकडे टॉवेल, कानातली, बांगडया. कुठे खेळणी, कुठे पुस्तके, कुठे पडदे, तर कुठे भेट वस्तु.

इकडे आइसक्रीमवाला. पलिकडे भेळवाला. तिकडे पेरूवाला मस्त पेरू चिरुन देतोय. न घेउन कसे चालेल?
तिकडे त्यानी आवळे मस्त मिठ मिर्ची लावुन ठेवले आहेत. घेतलेच पाहिजे.

हे मिळते का ऑनलाइन खरेदी करता करता?

पर्स घ्यायला गेलो की छोटी, मोठी, खंद्यावर लटकवता येइल अशी..अश्या खुप पर्स असतात. मग ह्या छोट्या पर्स मधे थोडी मोठी नही का? की दुकानदार लगेच तशी थोडी मोठी पैदा करतो कुठून तरी, आणी आपण अनेक पर्स बघून, त्यांना स्पर्श करुन, उघडुन बंद करुन, शेवटी हवी तशी पर्स घेउन तृप्त होउन बाहेर पडतो.

साधी भांडी किंवा अगदी एखादी सुई घेताना पण मजा च असते. खरंच.

तर, बाजारात जाऊन केलेली खरेदी ही नुस्ती वस्तु घरात आणण्यापुरती नसते. त्यात लोकांशी संवाद असतो, भाव करण्याची कला असते. त्यातून वस्तूंची तुलना करण्याची क्षमता वाढते. अनेक वस्तु दिसत असताना गरजेची वस्तुच घेण्याचा संयम ठेवणे तिथे शिकता येते.
बाजारात नवीन काय आले आहे हे नुसते बघूनच नाही तर स्पर्श करुन अनुभवता येते. शारिरीक हालचाल होते ती वेगळीच.

बरीच वयस्कर माणसे ऑनलाइन व्यवहार जमत असुन बैंक, LIC, किराणा, औषधे, भाज्या वगेरे सगळे व्यवहार जातीने त्या त्या ठिकाणी जाऊन करतात. त्याचे कारण म्हणजे एरवी असलेला एकटेपणा अश्या गोष्टीतून घालवता येतो.
माणसांशी प्रतक्षात भेटी गाठी होतात. ओळखी होतात आणी त्या टिकतात. खरखुरा संवाद, कधी वाद, होतो.

तर..खरेदी...

खरेदी झल्यावर, हुश्श करत, 10 मिनिटे वेटिंग नंतर, वाडेश्वर चा डोसा आणी दहिवडा.
अहाहा.
सुख.

हे सुख ऑनलाइन शॉपींग मधे मिळते का?
नक्किच नाही.
चला तर मग.

ऑनलाइन शॉपींगच्या आभसी जगातुन बाहेर निघा. बाहेर एक खरेखुरे जग अजुनही अस्तित्वात आहे. डोळे उघडुन त्या कडे बघा. माणसांशी संवाद साधा.
आणी खरेदीचा मनमुराद आनंद लुटा 😀

No comments:

Post a Comment

Followers