Thursday 31 October 2013

जुने ते सोने?


काल बस मध्ये जात होते आणि एका बाईंचे बोलणे कानावर पडले. त्या अगदी तावा तावाने  स्वताच्या मुली आणि सुनेविषयी बोलत होत्या – “काय ह्या आज-कालच्या मुलीसाडी नेसायला नको अजिबात. म्हटले सणाच्या दिवशी / लग्नाला जाताना तरी साडी नेसातर म्हणे ऑफिसला जायचे आहे! साडी नकोच! लग्नाला जायचे तर वेळ नाही…” असे खूप काहीतरी तक्रारीच्या सुरात बोलणे चालू होते. दुसर्या बाई होनाही म्हणून ऐकून घेत होत्या.

मला हसायला आले.  आमच्या वेळेला असे नव्हते, पूर्वी असे नव्हते, आता असे आहे, तुमच्या काळात हे असे आहे वगेरे बोलणी आपण नेहेमी ऐकत असतो. आणि नुसती ऐकत नसतो तर आपल्याला स्वतःला पण तसेच वाटत असते.

मी आणि माझ्या सारख्या मध्यम वयाच्या बायकांना आज कालच्या मुली बघितल्या -जीन्स, स्कर्ट्स घातलेल्या कि वाटते, आमच्या वेळेला जीन्स इतक्या कॉमन नव्हत्या हो!
कॉलेजमध्ये तरी आम्ही सगळ्या चुडीदार नेसून जात होतो. जीन्स म्हणजे त्या वेळी जास्त मोडर्न मुली होत्या त्याच घालत होत्या.

मग वाटले - आई आणि मावशीच्या जनरेशनला वाटत असेल - काय बाई ह्या मुली, आमच्या काळात आम्ही साडी नेसून कॉलेजला जात होतो. लांब केस, पाचवारी साडी! एखादी मुलगी चुडीदार नेसून आली कि तिला बघायला संपूर्ण कॉलेज लोटत असे. आज काल सारखे नव्हते आमच्या वेळी. BA झाले कि शाळेत नोकरी, नाही तर बँक. आणि मग काय लग्न आणि मुले. आमच्या वेळेला हे असले IT  चे फ्याड नव्हते हो!

आणि आजीला वाटत असेलकाय ह्या आज काल च्या मुली! आमच्या  वेळेला नवते हो असे!  आम्ही नऊवारी साडी नेसून शाळेत जात असू.
कॉलेजला जाणारी मुलगी म्हणजे फारच पुढारलेपणा झाला हो. कॉलेजला जाऊन काय मास्तरकी करायची आहे कि काय ह्या मुलींना? एस एस सी झालो - बास झाले.

पणजीची पिढी विचार करत असेल - कशाला हवी आहे शाळा आणि पुस्तके? पुस्तक शिकून काय करायचे आहे? त्या पेक्षा सैपाक शिका आणि संसार करा सुखाने.  नवर्याने सवत आणू नये असे वाटत असेल तर त्याची नीट सेवा करा. नवी थेरे नुसती! शिकायचे आहे म्हणे!  आमच्यावेळी नव्हती हो अशी बुके शिकण्याची थेरे!

त्या आधी महाभारत काळात काय म्हणत असतील?

महाभारत काळात कुंती आणि गांधारीला वाटत असेल का? काय हि आजकालची मुले? रामायण काळात बघा! असे नव्हते तेव्हा. पूर्वी रामायण काळात एका भाव साठी दुसरा राज्य सोडून वनवासात गेला आणि तो भरत पण नुसता खडावाना गादीवर बसवून त्याची पूजा करत होता.  नाही तर हे आज काल चे भाऊ! राज्य मिळावे म्हणून युद्ध करायला निघाले आहेत!

आणि हे दुःशासन आणि दुर्योधन! म्हणावे जरा लाक्ष्मणाडून शिका काही? त्या वेळी लक्ष्मण, सीता आणि रामासाठी घर दार सोडून वनवासात गेला. त्याने कधी सीतेच्या चेहेर्याकडे देखील पहिले नाही, आणि हे - मेले नातादृष्ट - वाहिनीचे वस्त्रहरण करायला निघाले आहेत - भर सभेत!

आणि हे आजकालचे नवरे पण षंढ झाले आहेत कि काय? सीतेचे हरण केले तर रामानी रावणाशी युद्ध केले आणि त्याचा वध केला. आणि हे - आहेत पण एकानी पण त्या द्रौपदीची मदत केली का? अरे त्या काळी असे अधःपतन नव्हते हो ! तो रावण बरा! त्याने सीतेला पूर्ण मर्यादेनी ठेवले तिथे अशोकवनात ! आणि हि आज कालची मुले!

सीता आणि कौसल्या म्हणत असतील का असे? काय हे दिवस आले आहेत? आक कैकेयी सवतीमत्सर करते आहे. पूर्वी असे नव्हते हो! पूर्वी राजे - राण्या करायचे आणि त्या कश्या सुखानी नांदत होत्या. कधी कोणी कोणाला असे वनवासात नाही हो पाठवले! सगळे कसे गुण्यागोविंदानी राहत होते.  काय ह्या आजकालच्या राण्या? म्हणे माझा मुलगा राजा होऊ दे आणि सवतीच्या मुलाला वनवास!

तर -- ह्या वरून हे सिद्ध होते कि नेहेमी  "आज"ची तुलना "काल"शी होते आणि प्रत्येक काळात बदल हा नकोसा वाटतो.

बदल एका दिवसात घडत नसतो. बदल घडायला आणि रुजायला आणि परत नवीन बदलाची सुरुवात होण्या साठी काल पुढे चालवा लागतो.

आणि काळ पुढे चालतो आहे, बदल घडत आहेत हे, चांगलेच आहे - नाही का?

Followers